मुंबईतील कांदळवनांवर ‘सीसीटीव्ही’ची नजर, 279 कॅमेरे लावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी मुंबई महानगर परिसरातील कांदळवनांवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई महानगर परिसर क्षेत्रात 279 सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात येणार आहेत. यावेळी कांदळवनांचे जतन व संवर्धन करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानची बैठक पार पडली.

कांदळवन भागात सीसीटीव्ही लावण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अहवालानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात 106 संवेदनशील ठिकाणी एकूण 279 सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. यासाठी 35 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱया टप्प्यात पश्चिम व मध्य मुंबई व तिसऱया टप्प्यात नवी मुंबई व ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा समावेश आहे.

नियामक मंडळाच्या बैठकीस पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, आमदार वैभव नाईक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक वीरेंद्र तिवारी, महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैविविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाचे सदस्य, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वडाळ्यात कांदळवन संशोधन केंद्र

एमएमआरडीएने एमटीएचएल प्रकल्पांतर्गत कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी दिला असून त्यातून भक्ती पार्क, वडाळा येथे कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी निविदेद्वारे काम करण्यासाठी सर्वात कमी दर असलेल्या मे. टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

कांदळवनांची लागवड करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांदळवन वाचवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती करावी तसेच सागरतटीय भागात कांदळवन वृक्षाची लागवड करण्यात यावी, अशा सूचनाही दिल्या. कांदळवन प्रतिष्ठानमार्फत विकसित करण्यात येत असलेली निसर्ग क्षेत्रे, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य आणि इतर उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पर्यटनाला चालना द्यावी, असेही ते यावेळी म्हणाले.