
सामना प्रतिनिधी। मुंबई
विद्यावेतन वाढवण्यात यावे, टीबी झालेल्या डॉक्टरांना रजा देताना त्यांचा शैक्षणिक कालावधी वाढवला जाऊ नये आणि महिला डॉक्टरांना प्रसूती रजा मिळावी या मागणीसाठी मुंबईतील निवासी डॉक्टरांनी उद्या संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप केला जाणार आहे.
अकोला, अंबाजोगाई, लातूर, नागपूर येथील निवासी डॉक्टरांना गेले चार महिने विद्यावेतन मिळालेले नाही. तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी अनेकदा मागणी करूनही विद्यावेतन देण्यात आलेले नाही. केंद्र सरकारच्या निवासी डॉक्टरांइतकेच विद्यावेतन राज्यातील निवासी डॉक्टरांना मिळावे, अशी आमची मागणी असल्याचे ‘मार्ड’ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले. दर तीन वर्षांनी निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वाढवले जाईल असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते; परंतु जानेवारी महिन्यात तीन वर्षे पूर्ण होऊनही ते वाढलेले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. टीबीची लागण झालेल्या निवासी डॉक्टरांना रजा दिली जाते; पण त्याबदल्यात त्याचा शैक्षणिक कालावधी सहा महिने ते एक वर्ष पुढे ढकलला जातो. महिला डॉक्टरांना प्रसूती रजा मिळण्यातही अडथळे येतात, असेही त्यांनी सांगितले.


























































