
महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल पालिकेच्या वांद्रे-कुर्ला जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोना लस घेतली. ही लस घेतल्यानंतर आपल्याला कोणताही त्रास झाला नसून कोणीही लसीकरणासाठी भीती बाळगू नये असे महापौरांनी सांगितले. मुंबईत लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मार्चपासून झाला असून 45 ते 59 वर्षीय सहव्याधी असणारे आणि 60 वर्षांहून मोठ्या नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण सुरू असून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात येत आहे. कोविड लस सुरक्षित असल्याने लस टाळू नका, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. यानंतर निवासस्थानी नियमित कामकाज पार पाडले. विशेष म्हणजे आजच लस घेऊनही त्यांनी ऑनलाइन महासभेचे कामकाज पार पाडले. हे कामकाज दोन तासांपेक्षा अधिक वेळ सुरू होते. लस घेतली तरी कोरोना टाळण्यासाठी मास्कचा वापर, हातांची स्वच्छता आणि सामाजिक अंतर ही त्रिसूत्री वापरणेही गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
























































