
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-3 प्रकल्पाचा 37 वा टप्पा आज यशस्वीरीत्या पूर्ण झाला. हुतात्मा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत डाऊन लाइनच्या 569 मीटर लांबीचे भुयारीकरण 418 रिंग्सच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले. या कामासाठी 106 दिवस लागले. या कामामुळे कफ परेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानच्या 2.9 किलोमीटर लांबीचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. सूर्या-2 या रॉबिन्स बनावटीच्या डय़ुएल-मोड हार्ड-रॉक टनेल बोअरिंग मशीनच्या सहाय्याने हे भुयारीकरण करण्यात आले. या भुयारीकरणाच्या मार्गावर अनेक ऐतिहासिक वारसा इमारती होत्या. तसेच हे काम समुद्राजवळही होती. त्यामुळे आव्हानात्मक होते. या भुयारीकरणानंतर मेट्रो-3 च्या पॅकेज-1 मधील 96 टक्के काम पूर्ण झाले आहे, असे मुंबई मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी सांगितले. भुयारी मेट्रोच्या पॅकेज-1 मध्ये कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक या स्थानकांचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये भुयारीकरणाचे सहा टप्पे आहेत.

























































