
मुंबई मेट्रो रेल महामंडळ (एमएमआरसीएल) मियावाकी पध्दतीने नऊ हजार झाडांचे रोपण करणार आहे. त्यासाठी एमएमआरसीएलने फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रबरोबर (एफडीसीएम) करार केला आहे. त्याअंतर्गत गोरेगाव परिसरातील इनॉर्बिट मॉलजवळ तीन हजार चौरस मीटर भूखंडावर हे रोपण केले जाणार आहे.
मियावाकी पध्दतीने अत्यल्प कालावधीत घनदाट वननिर्मिती करता येते. पर्यावरण संरक्षणासाठी ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एमएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी दिली. रोपण करण्यात येणाऱ्या झाडांमध्ये कडुनिंब, आवळा, बपुळ, सीता अशोक, चिंच, अर्जुन, बदाम आणि काथ आदी प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. पुढील दोन वर्षे या झाडांची मशागतही केली जाणार आहे.


























































