अल्पवयीन मुलाकडून फेसबुकवर मुलीची छळवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

फेसबुकवर एका अल्पवयीन मुलीचा फोटो आवडला म्हणून तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून नंतर तिला नाहक त्रास देणाऱया अल्पवयीन मुलाला घाटकोपर पोलिसांनी शोधून काढले आहे. सुरुवातीला बोलणारी मुलगी अचानक भाव द्यायची बंद झाल्यामुळे मुलाने तिचे मॉर्फिंगद्वारे अश्लील फोटो बनवून ते तिला पाठवले. शिवाय तिच्याशी गलिच्छ भाषेत चॅटिंग केले होते.

घाटकोपर मध्ये राहणाऱया एका विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार दिली होती की, एक तरुण मला फेसबुक मॅसेंजर व व्हॉटस्ऍपवर माझेच मॉर्फिंग केलेले अश्लील फोटो पाठवतो आहे. शिवाय अश्लील भाषेत बोलून धमकावत आहे. त्यामुळे घाटकोपर पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल केला आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास दातीर, एपीआय दीप बने, उपनिरीक्षक मोहन जगदाळे, संतोष जाधव आदींच्या पथकाने तपास सुरू केला.

संबंधीत भामटा खारदांडा परिसरात राहत असल्याची माहिती काढली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यापर्यंत धडक मारल्यावर तो अल्पवयीन मुलगा निघाला. मुलगा आणि पीडित मुलगी दोघेही नेपाळचे आहेत. दोघे फेसबुकवर चॅट करू लागले, पण मुलाचे बोलणे वेगळे वळण घेऊ लागल्यामुळे तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. यामुळे संतापलेल्या मुलाने तिचे फोटो मॉर्फिंगद्वारे अश्लील बनवले व तिला ते पाठवले. हे सगळे करण्याची आयडिया त्या मुलाला कोणी दिली याचा घाटकोपर पोलीस शोध घेत आहेत.