
>> रतींद्र नाईक
धूर, वातावरणातील प्रदूषित घटक यामुळे मुंबईची हवा खराब झाली असतानाच मुंबईच्या वायू प्रदूषणाला महापालिकेच्या विकासकामांकडूनच हातभार लावला जात आहे. प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन पालिकेकडून गेल्या अकरा महिन्यांत करण्यात आले असून पालिकेच्या सुरू असलेल्या 1 हजार 029 कामांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे 153 बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली असून त्यापैकी 124 बांधकामांना बजावण्यात आलेली काम थांबवण्याची नोटीस पालिकेने मागे घेतली आहे. महापालिकेनेच ही माहिती हायकोर्टात दिली आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची दखल घेत हायकोर्टाने याप्रकरणी ‘स्युमोटो’ याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर नुकतीच मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने पालिकेला फटकारल्यानंतर प्रशासनाकडून खंडपीठाला पालिकेने केलेल्या कारवाईबाबत माहिती देण्यात आली. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने 28 मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाते की नाही तसेच प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना हे तपासण्यासाठी वॉर्ड स्तरावर पथक स्थापन केले आहेत. या पथकांनी जानेवारी ते नोव्हेंबर 2025 दरम्यान विविध बांधकामस्थळी टाकलेल्या धाडीबाबत न्यायालयाला माहिती देण्यात आली.
पालिकेच्या 24 वॉर्डमध्ये प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 5655 खासगी बांधकामांना, 1029 पालिकेच्या बांधकामांना इतर प्राधिकरणाच्या 2009 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस पालिकेने बजावली आहे. तर 2585 खासगी बांधकामांना, 153 पालिकेच्या बांधकामांना, 759 इतर प्राधिकरणांच्या बांधकामांना पालिकेच्या पथकाने काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. न्यायालयाने ही माहिती दाखल करून घेत या प्रकरणावरील सुनावणी 20 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे.
2712 बांधकामांना धाडलेली नोटीस मागे
प्रदूषणाचे नियम पायदळी तुडवणाऱया विविध बांधकामांना कारणे दाखवा तसेच काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आल्यानंतर पालिकेने 1 हजार 194 बांधकामांना पाठवलेली कारणे दाखवा नोटीस तर 1 हजार 518 बांधकामांना बजावलेली काम थांबवण्याची नोटीस पालिकेने मागे घेतली आहे.


























































