‘ई’ वॉर्ड ऑफिस इमारतीचा पुनर्विकास स्थानिकांना विश्वासात घेऊनच होणार! शिवसेना, महाविकास आघाडीला आराखडे, नकाशांचे सादरीकरण

पालिकेच्या ‘ई’ वॉर्ड ऑफिस इमारतीचा पुनर्विकास स्थानिकांना विश्वासात घेऊनच केला जाणार आहे. याआधी पालिकेने या इमारतीच्या पुनर्विकासाचा आराखडा बनवताना स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिकांना कोणतीही माहिती दिली नव्हती. पालिकेच्या या मनमानी कारभाराविरोधात शिवसेनेने आंदोलन केले होते.

महापालिकेची ‘ई’ वॉर्ड ऑफिसची इमारत जीर्ण झाल्याने खासगी विकासकाकडून पुनर्विकास करण्याचे प्रस्तावित आहे. त्या जागी आयकॉनिक इमारत कार्यालय म्हणून उभारण्यात येणार आहे. सध्याचे कार्यालय हे आता माझगाव म्हाडा कॉलनी, घोडपदेव येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. पुनर्विकासानंतर वास्तू कशी दिसणार आहे, याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी केलेल्या सूचनेनुसार, शिवसेनेचे उपनेते, भायखळा विधानसभा मतदार संघाचे आमदार मनोज जामसुतकर यांच्यासह शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. या वेळी परिमंडळ-1च्या उपायुक्त संगीता हसनाळे, सहाय्यक आयुक्त त्रिवेदी यांच्यासह बबन गावकर, ऍड. मंगेश बनसोड, राम सावंत, विजय कामतेकर, सूर्यकांत पाटील, हेमंत कदम, काका चव्हाण, सलीम शेख उपस्थित होते.