Mumbai News – भाऊरायाच्या यकृतदानामुळे बहिणीला जीवदान; मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात अनोखे रक्षाबंधन

रक्षाबंधनाचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. हा सण म्हणजे बहिणीच्या रक्षणासाठी भाऊरायाने दिलेले वचन मानला जातो. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात भाऊरायाच्या अनोख्या ‘रक्षा’बंधनाची प्रचिती आली. ‘विल्सन’ आजाराने त्रस्त असलेली बहिण मृत्यूशी झुंज देत असताना भाऊराया तिच्या रक्षणासाठी उभा राहिला. भावाने आपल्या यकृताचा काही भाग दान करून धाकट्या बहिणीला विल्सन आजारापासून वाचवले. त्यामुळे बहिणीला नवीन जीवन मिळाले. या भावंडांना रक्षाबंधनाच्या आधी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. या भाऊ-बहिणीचे प्रेम पवित्र नात्याची वीण घट्ट करणारे हृदयस्पर्शी उदाहरण बनले आहे.

गुजरातच्या पालनपूर येथील 32 वर्षीय अनसने आपल्या 27 वर्षीय बहिणी हुमेरा हिचे जीवन वाचवण्यासाठी यकृताचा एक भाग दान केला. 9 जुलै रोजी मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये जीवनरक्षक प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. हुमेरा ही विल्सन नावाच्या दुर्मिळ अनुवांशिक आजाराने त्रस्त होती. या आजारावर उपचार न केल्यास यकृत निकामी होते. त्यात न्यूरोलॉजिकल समस्या तीव्र होऊन मृत्यूदेखील होऊ शकतो.

हुमेराला विल्सन आजाराचे निदान झाले, तेव्हा तो आजार कावीळ व सिरोसिसच्या टप्प्यात होता. तिला यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता होती. ही गरज ओळखून अनसने बहिणीला यकृत दान करण्यास तयारी दर्शवली. त्याच्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर यकृत प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर फोर्टिस रुग्णालयाचे संचालक डॉ. विक्रम राऊत यांनी त्यांच्या टीमच्या मदतीने जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यामुळे हुमेराच्या जीवावरील धोका टळला आणि तिला नवीन जीवन लाभले आहे. सध्या दोघे भावंडे सुखरुप असून त्यांनी शनिवारी जीवनाच्या नव्या उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

हुमेरासारख्या तरुण रुग्णांना जीवनदान मिळाल्याचे पाहून आनंद होतो. इतक्या लहान वयात अवयव निकामी होणे हे प्रचंड त्रासदायी असते. परंतु वेळेवर निदान व योग्य काळजी घेतल्यास दुर्मिळ अनुवांशिक आजारातून बरे होणे शक्य आहे. आमच्या क्लिनिकल व सपोर्ट टीमने प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली, अशी प्रतिक्रिया मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयाचे फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. विशाल बेरी यांनी दिली.