
विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरील तपासणी कक्षातील स्पॅनिंग मशीनला आज दुपारी आग लागली. यावेळी विधान भवनात धुराचे लोट पसरले होते. विधान भवनात नेमके या वेळेस किमान साठ-सत्तर आमदार होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची एकच धावपळ उडाली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र यामुळे विधान भवनाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
विधान भवनात विधिमंडळांच्या विविध समित्यांचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी 60 ते 70 आमदार विधिमंडळात होते. समित्यांचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार भोजन करत असतानाच दुपारी तीन वाजता हा प्रकार घडला. यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने या आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले तरी, विधान भवनाच्या सुरक्षा यंत्रणेविषयी आणि विद्युत यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विधान भवन हा परिसर कायमच गजबजलेला असतो. येथे नेत्यांची व कार्यकर्त्यांची गर्दी असते. शिवाय येथे दररोज हजारो कर्मचारी काम करत असतात.
आदित्य ठाकरेंकडून पाहणी
या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत स्पॅनिंग मशीनची पाहणी केली.
शॉर्ट सर्किटमुळे आग – राहुल नार्वेकर
या घटनेसंदर्भात माहिती देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, विधान भवनाच्या तपासणी कक्षातील स्पॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. यात कोणीही जखमी झाले नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.





























































