
कैद्यांच्या भांडणात हस्तक्षेप करायला गेलेल्या अधिकाऱ्यावर कैद्यावर हल्ला केल्याची घटना मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात घडली. या हल्ल्यात तुरुंग अधिकारी राकेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. चव्हाण यांच्या तक्रारीवरून एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अफान सैफुद्दीन खान आणि इतर दोन-तीन कैद्यांमध्ये भांडण सुरू होते. यावेळी अधिकारी राकेश चव्हाण यांनी भांडणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता अफान नामक कैद्याने त्यांच्यावर हल्ला केला. चव्हाण यांच्या डोक्यात वार केला असून डोळ्याजवळही गंभीर दुखापत झाली. चव्हाण यांच्यावर हल्ला केल्यानंतरही अफान शिवीगाळ आणि सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होता.
तुरूंग कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत चव्हाण यांना सरकारी रुग्णालयात नेले. तुरुंग प्रशासनानेही या घटनेला दुजोरा दिला आहे. एन.एम. जोशी मार्ग पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. ही घटना कैद्यांमधील टोळीयुद्धाशी संबंधित आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.