
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) उभारलाच पाहिजे, अशी भावना व्यक्त करीत मुंबईकरांनी शुक्रवारी स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने रेल कामगार सेनेतर्फे सीएसएमटी येथील उपनगरीय लॉबीसमोर स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. या मोहिमेला 10 हजारांहून अधिक मुंबईकरांनी प्रतिसाद दिला.
30 वर्षांपूर्वी नामांतरण होऊनही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा अद्याप उभारण्यात आलेला नाही. सरकार पातळीवरील या अनास्थेकडे लक्ष वेधण्यासाठी रेल कामगार सेनेने शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी स्वाक्षरी मोहिम राबवली आहे. सीएसएमटीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या प्रांगणात शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी करीत मुंबईकरांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी तिरुमलेश अंबाला, अजय कुमार डी. विवेक विक्रम, प्रदीप पाटील, हरीश वाघेला, पी.के. शर्मा, सचिन जोशी, महेंद्र म्हात्रे, मेघश्याम शिरोडकर, अभय वर्तक, विकास पाटील, मंगेश पाटील, निलेश पाटील, पी.ए.इ. राज, सतीश देसाई, सुशांत पैठणकर आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. पुढील तीन दिवस ही स्वाक्षरी मोहिम सुरु राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वे मार्गावरील रनिंग ब्रँचप्रमुख प्रशांत कमानकर यांनी दिली.




























































