क्रूझ सहलीच्या नावाखाली फसवणूक करणारा जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सेवानिवृत्त बँक अधिकाऱयाची क्रूझ सहलीच्या नावाखाली फसवणूक करणाऱयाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. रामआशीष फौजदार सिंह असे त्याचे नाव आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

तक्रारदार हे वांद्रे परिसरात राहत असून ते सेवानिवृत्त आहेत. त्यांचे स्टेट बँकेत खाते आहे. 15 मार्चला त्यांना एका महिलेने फोन केला. क्रूझ सहलीचे आमंत्रण देत असल्याच्या भुलथापा तक्रारदारांना मारल्या. सहलीकरिता नोंदणी शुल्क म्हणून शंभर रुपये भरावे लागतील असे तक्रारदारांना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी नेटबँकिंगद्वारे 100 रुपये शुल्क भरले. नेटबँकिंग करत असताना त्यांना एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) आला. त्यांनी तो पासवर्ड वेबसाइटवर टाकला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 89 हजार रुपये काढण्यात आले. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक गिरीश अणावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी यांच्या पथकातील स्टाफने रामआशीषला उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हय़ाची कबुली दिली.

सिमकार्ड, आधारकार्ड केले जप्त
पोलिसांनी रामआशीषकडून 13 मोबाईल, 279 सिमकार्ड, 226 डेबिट कार्ड, 32 विविध बँकांची पासबुक, आधार कार्ड जप्त केले आहे. फसवणूक करणाऱया या टोळीने अनेकांची फसवणूक केली आहे.