पेन्शनची बतावणी करून तरुणीचा वृद्धेला गंडा

637

नायर रुग्णालयात वरिष्ठ नागरिकांना पेन्शस देत आहेत अशी बतावणी करून एका अज्ञात तरुणीने 75 वर्षीय वृद्धेच्या सोन्याच्या दोन बांगड्या, रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज शिताफीने काढून नेल्याची घटना नायर रुग्णालयात घडली. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ग्रँट रोड येथील पन्नालाल टेरेसमध्ये राहणाऱया हंसा मेहता (75) यांना बाजारात एक तरुणी भेटली. तरुणी गुजराती भाषेत बोलू लागल्यामुळे हंसा यांनी तिला प्रतिसाद दिला तेव्हा नायर रुग्णालयात वृद्धांसाठी पेन्शन देत असून आज फॉर्म भरण्याचा अखेरचा दिवस असल्याचे सांगितले. त्यानंतर चार हजार रुपये हंसा यांना देऊन तुम्हाला आणखी 10 हजार मिळतील. त्यासाठी आतमध्ये फॉर्म भरायला जावे लागेल. पण सोन्याच्या बांगड्या घालून गेलात तर समस्या होईल असे बोलून तरुणीने हंसा यांच्या हातातील सोन्याच्या दोन बांगड्या, चार हजारांची रोकड, मोबाईल काढून छोट्या पर्समध्ये ठेवला. त्यानंतर हंसा यांच्या हाताला धरून ती दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेली. त्यावेळी हंसा यांच्या हातातील पर्स घेऊन तिने त्यांना दुसऱ्या वॉर्डाच्या बाहेर बसवून फॉर्म घेऊन येते असे बोलून गेली ती परतलीच नाही.

आपली प्रतिक्रिया द्या