चोऱ्या करणाऱ्या बंगाली टोळीचा पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

लोकलमध्ये चोऱया करणाऱया बंगाली टोळीच्या रेल्वे गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ ) मुसक्या आवळल्या. रुहूल आमीन लष्कर, सफीक हुसेन गायन, अजिजुल कासीम लष्कर अशी या तिघांची नावे आहेत. त्या तिघांकडून 1 लाख 10 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मध्य रेल्वेच्या कल्याण, बदलापूर, डोंबिवली या रेल्वे स्थानकांत गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या सोनसाखळींची चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याचा तपास विशेष कृती दलाचे पोलीस करत होते. पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी कळवा येथील झोपडपट्टीतून रुहूल, सफीक आणि अजिजुलला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्या चौघांनी फरार साथीदार आलम राहच्या मदतीने चोऱया केल्याची कबुली दिली.

अटकेत असलेले तिघेही मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. चोऱया करण्याकरिता ते बंगाल येथून मुंबईत येत असायचे. चोरीचा मुद्देमाल ठेवण्याकरिता ते झोपडपट्टीमध्ये भाडय़ाने एक महिन्याकरिता रूम घायचे. 15-20 दिवस राहिल्यावर चोरीचा मुद्देमाल घेऊन ते पुन्हा बंगालला निघून जायचे. रुहूल हा टोळीचा म्होरक्या असून सफीक आणि अजिजुल हे फरार आरोपी आलमच्या मदतीने प्रवाशांना घेरायचे. सॅकबॅग प्रवाशाच्या बाजूस लावून सोनसाखळी चोरायचे. चोरलेला मुद्देमाल हा सोनाराकडे विकायचे तर काही चेन गॅस लायटरने वितळवून सोन्याची लगड तयार करायचे. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त विनय गाडगीळ, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संतोष धनवटे, विशेष कृती दलाचे पोलीस हवालदार सतीश क्षीरसागर, श्रीकृष्ण चव्हाण, विजय ढवळे, प्रवीण घार्गे, सुरेश येल्ला, जयेश थोरात, सतीश फडके, अमित बडेकर, गणेश माने, राजेश कोळसे यांनी ही कामगिरी केली.