
स्टार बॅक या दुर्मिळ कासवाची तस्करी करणाऱ्याला एमएचबी पोलिसांनी अटक केली. नदीम शेख असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीची कासवे जप्त केली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्टार बॅक कासव घरात ठेवल्याने श्रीमंती येते असा अनेकांचा समज आहे. त्यामुळेच स्टार बॅक कासवाची मागणी खूप असते. बोरिवली परिसरात एक जण स्टार बॅक कासवाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एमएचबी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे याना मिळाली. त्या माहितीनंतर वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर याच्या पथकातील डॉ. हिंडे, घोडके, शिरसाट आणि पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी बोरिवली येथून नदीमला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 20 स्टार बॅक कासव जप्त केली. कासव तस्करीप्रकरणी शेखविरोधात वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गुन्हा दाखल केला. शेख हा मीरा रोड येथील रहिवासी आहे. त्याने ती कासव कोणाकडून घेतली होती, बोरिवली येथे तो ती कासव कोणाला देणार होता याचा तपास एमएचबी पोलीस करत आहेत.































































