
महानगरपालिका सफाई कामगारांसाठी आश्रय योजनेअंतर्गत प्रि-फॅब्रिकेटेड निवासी घरे बांधणार असून चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर या वसाहती उभारल्या जाणार आहेत. यात 1 हजार 988 घरे बांधली जाणार असून त्यासाठी 560 कोटी खर्च अपेक्षित आहे. पालिकेत स्थायी समितीच्या आगामी बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे.
मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या 46 पैकी 34 वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेअंतर्गत करणार आहे. यात प्रायोगिक तत्वावर अंधेरी पश्चिम येथील यारी रोड, जुहू गल्ली, ए. बी. नायर रोड तसेच वांद्रे पश्चिम येथील न्यू हसनाबाद लेन येथील चार वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या इमारती प्रि- फॅब्रिकेटेड पध्दतीने उभारल्या जाणार आहेत. यासाठी 4 हजार 356 रुपये प्रतिचौरस फुटाच्या बांधकामाचा खर्च अंदाजित करुन निविदा मागवल्या होत्या तर कंत्राटदाराने 4 हजार 391 रुपये चौरस फुट दराने हे काम करण्याची तयारी दाखवली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी महानगर पालिका सर्व करांसह 560 कोटी 16 लाख रुपये खर्च करणार आहे.
प्रि-फॅब्रिकेटेड इमारतींच्या बांधकाला कमी खर्च येतो, असेही काहींचे मत आहे. पालिका या चार ठिकाणी 300 चौरस फुटांची 1 हजार 844 घरे बांधणार आहे. या प्रत्येक घराच्या बांधकामासाठी 20 लाख 70 हजार 776 रुपये खर्च करणार आहे तर 600 चौरस फुटाची 144 घरे बांधणार असून या घरांच्या बांधकामासाठी 41 लाख 41 हजार 552 रुपयांचा खर्च येणार आहे.






























































