
बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-19 लससाठा उपलब्ध झाल्याने सोमवार, दिनांक 12 एप्रिल 2021 पासून मुंबईतील निर्देशित 71 पैकी 62 खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे मुंबईत 49 तर खासगी रुग्णालयात 71 लसीकरण केंद्रं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी 40 ते 50 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.
मुंबईत लसीकरणासाठी मंजुरी मिळालेल्या 71 खासगी रुग्णालयात, शनिवार, दिनांक 10 एप्रिल 2021 आणि रविवार, दिनांक 11 एप्रिल 2021 असे दोन दिवस लसीकरण थांबले होते. तथापि, मुंबई महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु होते.
लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध होताच खासगी रुग्णालयातही लसीकरण पुनश्च सुरु केले जाईल, असे महानगरपालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते.
शुक्रवार, दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी रात्री उशिरा 99 हजार लसी आणि शनिवार, दिनांक 10 एप्रिल 2021 रोजी 1 लाख 34 हजार 970 अश्या एकूण 2 लाख 33 हजार 970 लसींच्या मात्रा मागील दोन दिवसात बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रासाठी लस साठा वितरित करण्यात आला आहे. यामुळे उद्या सोमवार, दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी नियमित वेळेत 71 पैकी 62 खासगी लसीकरण केंद्र देखील कार्यान्वित राहतील.































































