#CAA विरोधात मुंबईत निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) कायद्याविरोधात मुंबईतील वडाळा, वांद्रे, कांदिवली, मालवणी येथे मुस्लिम समाजाने निदर्शने केली.

मुंबईत गुरुवारी ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात डाव्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते. आजही वडाळा येथे रझा अकादमीच्या वतीने नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी नरेंद्र मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यात शेकडो मुस्लिम बांधव आणि नागरिक सहभागी झाले होते. काळे झेंडे दाखवून त्यांनी मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध केला.

नमाजानंतर मशिदींबाहेर निदर्शने
मुंबईतील अनेक भागांमध्ये मशिदींबाहेर निदर्शने करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी दुपारच्या नमाजानंतर मशिदीबाहेर जमून नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याची मागणी केली. वांद्रे येथील बडी मशीद तसेच कांदिवली, मालवणी येथील मशिदींबाहेर निदर्शने करण्यात आली. वांद्रय़ात गुरुवारीही हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र जमत सीएए कायद्याविरोधात निदर्शने केली होती.

भिवंडी, पनवेलमध्ये मोर्चा
भिवंडीसह पनवेलमध्येही या आंदोलनाचे पडसाद उमटले. भिवंडी महापालिका मुख्यालयासमोरील आनंद दिघे चौकात जमा होत हजारो मुस्लिमांनी मोदी सरकारचा निषेध केला. या आंदोलनाची दाहकता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत ठाणे, कल्याण तसेच अन्य भागातून येणाऱया एसटी, केडीएमसी व टीमटीच्या बसेसना शहरात नो एण्ट्री देण्यात आली. पनवेल परिसरातही जामा मस्जिद ट्रस्टचे मुफ्ती सय्यद मैनूर यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिमांनी मोर्चा काढला.