
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे पाठोपाठ शनिवार आणि रविवार अशा सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने मुंबई, ठाणेकर पर्यटनवारीसाठी निघाले खरे. मात्र एकाच वेळी हजारो वाहने रस्त्यावर उतरल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूककोंडी झाली. बोरघाटात वाहनांच्या तब्बल चार किलोमीटरच्या रांगा लागल्याने गाड्या कासव गतीने पुढे सरकत होत्या. त्यामुळे चाळिशी गाठलेल्या पाऱ्यात प्रवाशांची अक्षरश: भट्टी झाली.
15 ते 20 दिवसांपासून उष्णता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वजण हैराण झाले असून थोडा मोकळा श्वास घ्यावा म्हणून अनेकांनी लोणावळा, माथेरान तसेच रायगडातील समुद्रकिनारे खुणावू लागले आहेत. हा बेत ठरत असतानाच आजपासून सलग चार सुट्ट्या आल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई या महानगरातील पर्यटकांनी बॅगा भरून कुटुंबकबिल्यासह गाड्या बाहेर काढल्या. कोणी मुंबई गोवा तर कोणी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने सुसाट निघाले. मात्र नेहमीपेक्षा जास्त म्हणजे तिप्पट वाहने रस्त्यावर उतरल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. बोरघाटात पुणे लेनवर चार चार किलोमीटरच्या रांगा लागल्याने वाहतूक धिम्या गतीने पुढे सरकत होती. त्यामुळे या कोंडीत फसल्याने पर्यटनवारीसाठी निघालेल्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.






























































