मुंबई ते पुणे रेल्वे मार्ग विस्कळीतच! गाड्यांच्या वेळात 31 डिसेंबरपर्यंत बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या मुंबई ते पुणे मार्गावरील लोणावळा ते कर्जत घाट सेक्शनमध्ये मंकी हिल ते नागनाथदरम्यान अप मार्गावर रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्याने दुरुस्तीचे मोठे काम सुरू आहे. हे काम येत्या 15 जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने 31 डिसेंबरपर्यंतच्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

यंदा झालेल्या अतिवृष्टीने मंकी हिल ते नागनाथ या पट्ट्यातील रेल्वे रुळांची मोठी हानी झालेली आहे. त्यामुळे अप मार्गावर दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. परिणामी गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेला आहे. 31 डिसेंबरपर्यंत गाड्यांमध्ये झालेले बदल खालीलप्रमाणे राहणार आहेत. यादरम्यान मुंबई-पंढरपूर पॅसेंजर गाडी 29 डिसेंबरपर्यंत, मुंबई-बिजापूर पॅसेंजर आणि पुणे-पनवेल पॅसेंजर या दोन गाड्या 31 डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे-भुसावळ एक्स्प्रेस 1 ते 31 डिसेंबरदरम्यान दौंड-मनमाडमार्गे चालविण्यात येणार आहेत.

याशिवाय कोयना एक्स्प्रेस, एलटीटी-हुबळी एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस, पनवेल-नांदेड एक्स्प्रेस आणि नांदेड-पनवेल एक्स्प्रेस या गाड्या पुणे स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहेत. तसेच पुणे स्थानकातूनच पुढे नव्याने रवाना करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे.