सामना प्रतिनिधी। मुंबई
मुंबई आणि नवी मुंबईत गेल्या काही दिवसांत पुलांच्या दुर्घटना घडल्या आहेत. काही पूल जुने, धोकादायक झाले आहेत. त्यामुळे शहर व उपनगरातील सर्वच उड्डाणपूल, पादचारी पूल, स्कायवॉकवर तो कोणी व कधी बांधला, मालकी असलेल्या प्राधिकरणाचे नाव, बांधकाम करणाऱया कंपनीचे नाव, खर्च, परिरक्षण कोण करते आदी माहिती दर्शविणारे फलक लावण्याची मागणी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी पादचारी पूल, रेल्वे रुळांवरील पूल, उड्डाणपूल, स्कायवॉक लोकांच्या सुविधेसाठी बांधले आहेत. अनेक पूल हे इंग्रजांनी बांधलेले आहेत. हे पूल किती जुने आहेत, दुरुस्तीची आवश्यकता किती प्रमाणात आहे, स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे की नाही ही माहिती देण्यात यावी, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली.





























































