महत्त्वाचे- एसटीच्या मुंबई सेंट्रल डेपोत पाणी

एसटीच्या मुंबई सेंट्रल डेपोत पाणी
सलग दुसऱ्या दिवशी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे एसटीच्या मुंबई सेंट्रल आगार परिसरात पाणी साचले. याच
आगारात महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालय आहे. काही महिन्यांपूर्वी आगाराच्या अर्ध्या भागात काँक्रिटीकरणाचे काम केले, मात्र आगार व्यवस्थापक कार्यालयासमोरील भागाची दुर्दशा जैसे थे आहे. या भागात खड्डे पडले असून मुसळधार पावसात खड्डय़ांमध्ये पाणी साचून आगार परिसर जलमय झाला. या ठिकाणी ग्रामीण भागातून येणाऱ्या बसगाडय़ा पार्क केल्या जात आहेत.

रेल्वे छतांच्या अर्धवट कामाचा त्रास
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांत सरकते जिने, पायऱयांची कामे अर्धवट स्थितीत पडलेली आहेत. ही कामे पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्यात रेल्वे प्रशासन सपशेल अपयशी ठरले. त्याचा त्रास सोमवारी प्रवाशांना सहन करावा लागला. त्या कामांसाठी ठिकठिकाणी प्लॅटफॉर्मवरील छत खोलले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी थेट प्लॅटफॉर्मवर पडत असून प्रवाशांना छत्री उघडून लोकल ट्रेन पकडावी लागते. तसेच अनेक ठिकाणी बांधकाम साहित्याचा प्रवाशांना अडथळा ठरत आहे.

मंत्रालयात फक्त 17 टक्के उपस्थिती
मुंबईसह आसपासाच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे सरकारी कर्मचाऱयांनी आज घरीच थांबणे पसंत केले. जागोजागी तुंबलेले पाणी, ट्रेनचा गोंधळा यामुळे शासकीय कर्मचाऱयांनी दांडी मारली. त्यामुळे आज मंत्रालयात फक्त 17 टक्के कर्चमारी उपस्थित होते.

पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला होता. लांब पल्ल्याच्या गाडय़ाही विलंबाने धावत होत्या. मंत्रालयातील कर्मचारी अगदी पुणे, नाशिक अशा विविध भागापासून कल्याण, डोंबिवली, पालघर डहाणू अशा विविध भागांतून येतात. मंत्रालयातील बहुतांश कर्मचारी-अधिकारी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे मंत्रालयीन कर्मचाऱयांनी दांडी मारली. त्यामुळे मंत्रालयात शुकशुकाट होता. सर्व विभागातील कार्यालये रिकामी होती. पावसाची परिस्थिती पाहून मंत्रालयीन कर्मचाऱयांना संध्याकाळी चारनंतर घरी जाण्याची मुभा देण्यात आली.