तिसऱया लाटेच्या मुकाबल्यासाठी मुंबई सज्ज! दोन हजार ऑक्सिजन बेडस्

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी तिसऱया लाटेचा इशारा आरोग्य तज्ञांकडून देण्यात आल्यामुळे पालिकेने आपली यंत्रणा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. दुसऱया लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड वाढवण्यात येत आहेत. यामध्ये भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास आणि गोरेगाव येथील ‘नेस्को’ जम्बो कोविड सेंटर-2 मध्ये प्रत्येकी एक हजार ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार आहेत. शिवाय पोदारमध्ये 30 आयसीयू घेतले जाणार आहेत.

कोरोनाच्या दुसऱया लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या दहा हजारांवर गेली असताना  दररोज ऑक्सिजन बेडची आवश्यकता असणारे रुग्णही वाढल्याने देशभरात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पालिकेने आपली सर्व यंत्रणा सक्षम ठेवल्याने मुंबईत कोणतीही दुर्घटना घडली नाही. पालिकेच्या जागरूकतेमुळे एक वेळ 167 रुग्णांना सुरक्षितरीत्या हलवल्याने मोठा अनर्थ टळला होता. असे असले तरी तिसऱया लाटेत दुसऱया लाटेपेक्षा जास्त वेगाने रुग्णसंख्या वाढण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची व्यवस्था पालिकेच्या माध्यमातून तैनात ठेवण्यात येत आहे. भायखळय़ाच्या रिचर्डसन क्रुडास कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड सुरू करण्याची मागणी करण्यात आल्यामुळे तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही प्रशासनाला दिले होते. या पार्श्वभूमीवर 4 कोटी 53 लाख 46 हजार रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

‘नेस्को-2’मध्ये फॅमिली वॉर्ड

तिसऱया लाटेत लहान मुलांना जास्त धोका वर्तवण्यात आल्यामुळे ‘नेस्को-2’मध्ये ‘फॅमिली वॉर्ड’ सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी 250 बेड असतील. बाधित मुलांसोबत गरज असल्यास पालकही थांबू शकणार आहेत. शिवाय या ठिकाणी मुलांसाठी सापशिडी, ल्युडो अशा गेमसह रीडिंग, हिरवळ, मनोरंजनाची व्यवस्था असेल. भिंती कार्टूनने रंगवण्यात येतील, अशी माहितीही डॉ. सलागरे यांनी दिली.

ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटरची सद्यस्थिती

पालिका आणि ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालये व जम्बो सेंटरमधील बेडनुसार मुंबईत 10 हजार 930 ऑक्सिजन बेड आहेत. यातील 1906 बेडवर रुग्ण दाखल असून 9 हजार 24 बेड रिक्त आहेत. तर एकूण 2633 आयसीयूपैकी 1216 आणि एकूण 1450 पैकी 542 व्हेंटिलेटर सध्या रिक्त आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध करून देण्यासाठी 2200 बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याने मोठी सुविधा निर्माण झाली. याच धर्तीवर उपलब्ध बांधकामात गेल्या एकाच महिन्यात दीड हजार बेड सज्ज करण्यात आले आहेत. यामध्ये 500 नियमित आणि एक हजार ऑक्सिजन बेड असतील, अशी माहिती ‘नेस्को-2’चे डीन डॉ. संतोष सलागरे यांनी दिली.