
राज्यातील खासगी शाळांमधील आरटीई प्रवेशाच्या 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची सोडत आज जाहीर करण्यात आली. मात्र किती विद्यार्थ्यांना या सोडतीत प्रवेश मिळाले आहेत याची माहिती जाहीर होऊ शकली नाही. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 15 एप्रिलपासून एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. मात्र पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता प्रवेशाच्या वेबसाईटवर जाऊन प्रवेशाची स्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाने केले आहे.
पुणे येथे आज महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, सहसंचालक दिनकर टेमकर, यांच्यासह आरटीई 25 टक्के आरक्षण पालक संघाच्या अध्यक्षा सुरेखा खरे यांच्या उपस्थितीत शैक्षणिक वर्ष 2021-22 बाबत 25 टक्के राखीव प्रवेशासाठी ऑनलाईन सोडत काढण्यात आली. ही प्रवेश प्रक्रिया पुढील दोन दिवस चालणार असल्याने नेमक्या किती जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आणि त्यानंतर किती जागा रिक्त राहिल्या ही सर्व माहिती दोन दिवसानंतर जाहीर केली जाईल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले.
राज्यातील 9 हजार 432 खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी 96 हजार 684 जागा उपलब्ध आहेत, या जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील तब्बल 2 लाख 22 हजार 267 पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत.

























































