
स्त्रीयांच्या जीवनात शिक्षणाची पहाट व्हावी यासाठी महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्य वेचले. त्यामुळे आज स्त्री शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. यासाठी आपल्याला थोर शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थान येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. यावेळी अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणाले, स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी अनेक यातना, हेटाळणी, हल्ले सहन केले. स्त्री शिक्षणातूनच कुटुंब आणि पर्यायाने समाज पुरोगामी विचारांच्या वाटेवर चालू शकतो. यामुळेच आज स्त्र्ायांनीही अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
महिला शिक्षण दिनाच्या शुभेच्छा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती यापुढे राज्यात सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे. या दिनानिमित्त शालेय शिक्षण विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याला उजाळा देणारे विविध उपक्रम नव्या पिढीच्या सहभागाने आयोजित केले जात आहेत. नियोजित अशा या सर्व उपक्रमांनाही मनःपूर्वक शुभेच्छा, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सावित्रीबाई फुलेंनी रचलेल्या पायावरच प्रगत, पुरोगामी हिंदुस्थान उभा आहे
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आजचा प्रगत, पुरोगामी, समर्थ हिंदुस्थान उभा आहे. देशातील स्त्री शक्ती आज सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे. स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे, याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी त्या काळात स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व सहन केलेल्या हालअपेष्टांना आहे. देश व देशातील स्त्री शक्ती क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

































































