शाळा पुन्हा गजबजल्या! पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने वर्ग सुरू, पहिल्याच दिवशी 4 लाख 80 हजार विद्यार्थी हजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने बारावीपर्यंतचे वर्ग पूर्ण वेळ भरविण्यात येत आहेत. आज पहिल्याच दिवशी मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये मिळून एकूण 4 लाख 79 हजार 945 विद्यार्थी हजर होते. यापैकी 2 लाख 3 हजार 206 विद्यार्थी पालिका शाळेतील असून 2 लाख 76 हजार 739 विद्यार्थी खासगी शाळेतील आहेत.

मुंबईत कोरोनामुळे नियमित शाळा सुरू होण्यास बराच उशीर झाला आहे. अखेर मुंबई महापालिकेने आज बुधवारपासून सर्व बोर्डांच्या पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या आधी शाळांमधील वर्ग दोन ते तीन तास भरत होते. पण आता नियमितपणे पाच ते सहा तास तासिका होणार आहेत. शाळांच्या तासिका वाढविल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बऱयाच दिवसांनी वर्गामधील मित्र-मैत्रिणींची भेट झाल्यामुळे तसेच शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधता येत असल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदालाही पारावार उरला नव्हता.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून शाळांमध्ये वर्ग भरविण्यात आले आहेत. कोरोनापूर्व काळाप्रमाणे शाळेत मधली सुट्टी, खेळांचे तासही होणार आहेत. आतापर्यंत ऑनलाईन वर्गांनाच हजेरी लावणाऱया विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बहुसंख्य शाळांनी ऑनलाईन वर्ग बंद पूर्णपणे करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील एकूण शाळा – 2249

एकूण विद्यार्थी – 6,83,065

एकूण उपस्थित विद्यार्थी – 4,79,945