
एसटीच्या ताफ्यात नवीन 700 बस दाखल होणार आहेत. त्यात 500 बस साध्या डिझेल प्रकारातील असतील तर 150 बस विनावातानुकूलित ‘शयनयान कम आसन’ प्रकारातील तर 50 बस सीएनजी इंधनावर धावणाऱया असणार आहेत. या बसेसची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने या बसेसचा समावेश महामंडळात होणार आहे.
एसटी मंडळाकडे सध्या 15,800 बसेसचा ताफा आहे. सध्या एसटीला दोन हजार बसेसची गरज आहे. एसटीकडे परिवर्तन प्रकारातील लाल रंगाच्या बसची अधिक संख्या असून त्यानंतर शिवशाही, अश्वमेध, शिवनेरी, हिरकणी आदी प्रमुख प्रकारच्या बसेस आहेत. पहिल्या टप्प्यात एसटी महामंडळ 700 नवीन बसची खरेदी करणार आहे. या बस नव्या प्रदुषण नियमांप्रमाणे बीएस-6 इंजिन प्रकारातील असतील. यात डिझेल इंजिनावर धावणाऱया साध्या 500 बस असतील. तर 150 बस या विनावातानुकूलित ‘शयनयान कम आसन’ बसेस असतील. तर 50 बस सीएनजीवर धावणाऱया असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. या नवीन बसेसच्या चेसिसकरीता निविदा काढली जाणार असून बसेसची बांधणी एसटी महामंडळाकडून केली जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास साधारण तीन महिने लागणार असून त्यानंतर टप्प्याटप्यात बस ताफ्यात समाविष्ठ होतील, अशी माहिती देण्यात आली.

























































