एसटीतील चालक-वाहक भरतीत दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांना प्राधान्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

राज्यातल्या दुष्काळग्रस्त जिह्यातील चालक व वाहकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी एसटी महामंडळाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये लेखी परीक्षेत समान गुण प्राप्त करणाऱया उमेदवारांचा गुणवत्ता क्रम लावताना दुष्काळग्रस्त जिह्यातील उमेदवारांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

राज्यातील बेरोजगार तरुण, विधवा, शहीद जवानांचे वारस, आत्महत्याग्रस्त शेतकऱयांचे वारस, दुष्काळग्रस्त भागातील तसेच सामाजिकदृष्टय़ा मागासलेल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभागाने भरीव योगदान दिले असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

महिलांना रोजगार
महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 21 आदिवासी युवतींची एसटीमध्ये चालकपदी नियुक्ती करण्यासाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. या प्रशिक्षणात युवतींना अटी व शर्तींमध्ये शिथिलता दिली असून प्रशिक्षणाच्या दरम्यान मोफत पास, गणवेश व विद्यावेतन दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना
मातृभूमीच्या संरक्षणासाठी शहीद झालेले संरक्षण दलातील अधिकारी-जवानांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजने’अंतर्गत चार शहीदांच्या वारसांची एसटी महामंडळात नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या विधवांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होण्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना’ अमलात आणण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे 392 अर्जदारांना ऑटोरिक्षाचे परवाने वितरित केले आहेत. परिवहन विभागाद्वारे मागील साडेचार वर्षांत 3 लाख 58 हजार 376 ऑटोरिक्षा व टॅक्सीचालकांना बॅजेस देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली

‘अबोली’ योजनेअंतर्गत महिलांना परवाने
मुंबईतील टॅक्सी तसेच मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक व संभाजीनगरमधील ऑटोरिक्षांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सरकारने निर्बंध घातले होते. पण नंतर हे निर्बंध उठवण्यात आले त्यानंतर राज्यात एकूण 2 लाख 32 हजार 039 रिक्षांचे व 4 हजार 901 टॅक्सीचे परवाने वितरित करण्यात आले. तसेच मुक्त परवाना धोरणानुसार 1 हजार 108 महिलांना ‘अबोली’ योजनेअंतर्गत परवाने देण्यात आले आहेत, असे दिवाकर रावते म्हणाले.