‘जेईई मेन’चा निकाल जाहीर; मुंबईच्या स्वयम चुबेने मिळवले 100 पर्सेंटाईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई-मेन’ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. देशात 24 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले. त्यात मुंबईच्या स्वयम् शशांक चुबे याचाही समावेश आहे. 99.99 पर्सेंटाईल मिळवून नागपूरची इंद्रायणी तायडे ही राज्यात मुलींमध्ये अव्वल ठरली.

1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत जेईई-मेन परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा ऑनलाइन जाहीर करण्यात आला. कोरोना लॉकडाऊनमुळे चार महिने विलंबाने ही परीक्षा घ्यावी लागली होती. सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करत 660 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली होती. 2019 पासून दरवर्षी दोन वेळा ही परीक्षा घेण्यात येते. जानेवारी आणि एप्रिलमध्ये ही परीक्षा घेतली जाते. यंदाच्या वर्षीच ती सप्टेंबरपर्यंत ढकलली गेली. 8 लाख 41 हजार उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 6 लाख 35 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

तेलंगणात सर्वाधिक टॉपर्स

जेईई-मेन परीक्षेत देशात सर्वाधिक आठ टॉपर्स तेलंगणामधील आहेत. त्यानंतर दिल्ली (5), राजस्थान (4), आंध्र प्रदेश (3), हरयाणा (2) आणि गुजरात व महाराष्ट्रातील प्रत्येकी एका टॉपरचा समावेश आहे.

खुल्या प्रवर्गातील कट-ऑफ वाढला

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) जाहीर केलेला कट-ऑफ पाहिला तर यंदा जेईई-मेन परीक्षेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा कट-ऑफ वाढला आहे. इतर प्रवर्गातील कट-ऑफ कमी झाला आहे. खुल्या प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले असा याचा अर्थ आहे.

स्वयमचे वडील हे डॉक्टर आहेत. लोअर परळ येथे त्यांचे क्लिनिक आहे. ‘स्वयम् याने जेईई परीक्षेच्या तयारीवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले होते. क्लासेसव्यतिरिक्त तो रोज चार-पाच तास अभ्यास करायचा. आता जेईई-ऍडव्हान्स परीक्षा देऊन आवडत्या आयआयटी संस्थेत प्रवेश घेण्याची त्याची इच्छा आहे.’ असे डॉ. चुबे यांनी सांगितले. चुबे कुटुंबीय हे मूळचे दादरचे असून स्वयम्चा प्रवासात जाणारा जास्तीत जास्त वेळ वाचावा या उद्देशाने ते तात्पुरत्या स्वरूपात अंधेरीच्या मरोळ येथे राहायला गेले आहेत.

अडीच लाख विद्यार्थी ऍडव्हान्ससाठी पात्र

जेईई-मेन परीक्षा दिलेले अडीच लाख टॉपर विद्यार्थी जेईई-ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 27 सप्टेंबर रोजी जेईई-ऍडव्हान्स परीक्षा घेतली जाणार आहे. त्या परीक्षेसाठी नोंदणीही सुरू झाली आहे. या वर्षी आयआयटी दिल्लीच्या वतीने जेईई-ऍडव्हान्स परीक्षा घेतली जाणार आहे.