
मध्यंतरी गायब झालेली थंडी आता परतली आहे. आज बुधवारी मुंबईकरांची पहाट उगवली ती बोचरी थंडी घेऊन. संध्याकाळी अनेक भागांत शेकोटय़ा पेटल्या. विशेष म्हणजे, आज मुंबईचे तापमान महाबळेश्वरपेक्षा दोन डिग्रीने कमी होते. महाबळेश्वरमध्ये 14.2 तर बोरिवलीत 12 डिग्री इतके किमान तापमान नोंद झाले. पुढचे दोन दिवस मुंबईत थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-कश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबईचे तापमान घसरले आहे. पहाटेच्या वेळस मेट्रो, लोकलमध्ये स्टीलच्या आसनांमुळे मुंबईकर आणखी गारठून जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, घसरत्या तापमानाबरोबरच प्रदूषणातही वाढ झाली आहे. मुंबईची हवाही बिघडली आहे. धुरके आणि धुक्यामुळे पहाटेच्या वेळेस दृश्यमानता कमी होत आहे. पुढील दोन दिवसांत मुंबईचा पारा 1 ते 2 डिग्रीने कमी होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दुसरीकडे राज्यातही थंडीचा कडाका वाढला असून सर्वात कमी तापमान नाशिक, नांदेड, परभणी, नागपूरमध्ये 12 डिग्री सेल्सियस इतके नोंदवले गेले.
म्हणून वाढणार कडाका
उत्तरेकडे तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. जम्मू-कश्मीरमध्ये तर 3 ते 4 फूट इतके बर्फ साचले आहे. येथून वाहणाऱया थंड वाऱयांनी मुंबईकरांना कूल…कूल… करून टाकले आहे. मुंबईत सांताक्रुझ येथे किमान तापमान 16.9 डिग्री तर सर्वात कमी तापमान बोरिवलीत 12 डिग्री सेल्सियस इतके नोंदवले गेले. मुंबईतले किमान तापमान 15 डिग्रीपर्यंत खाली येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मुंबईतले तापमान
किमान कमाल
बोरिवली 12 27
चेंबूर 17 26
पवई 16 26
वरळी 19 24
राज्यातले तापमान
नाशिक 12
नांदेड 12
नागपूर 12
परभणी 12
महाबळेश्वर 13
संभाजीनगर 14
नगर 15
चंद्रपूर 15
जळगाव 15
बीड 16

























































