
राज्यातील 15 अकृषि विद्यापीठातील मंजूर पदांपैकी शिक्षकांची 80 टक्के पदभरती करण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. विद्यापीठाच्या ज्या शैक्षणिक विभागात पदे भरण्याची आवश्यकता आहे. त्याच विभागात प्राधान्याने पदभरती होणार आहे. राज्यातील शिक्षकांच्या एकूण 1166 पदांपैकी 659 पदे भरली जाणार असून यातील सर्वाधिक पदे ही सहाय्यक प्राध्यापकांची आहेत.
अकृषि विद्यापीठातील शिक्षकांची पदे भरताना एकूण मंजूर पदांपैकी 80 टक्के मर्यादेत पदे भरली जाणार आहेत. तसेच ही पदे भरताना संबंधित शैक्षणिक विभागाचे मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन होण्यासाठी आवश्यक असलेली मर्यादा विचारात घेऊनच शिक्षकांच्या पदांचे वाटप करण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाने दिल्या आहेत. सदर भरतीची प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण होणार असून सर्व विद्यापीठांनी पदसंख्येच्या मर्यादित पदभरती करण्यासंदर्भातील प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण संचालकांकडे मान्यतेसाठी तातडीने पाठविण्याच्या सूचनाही उच्च शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
n मुंबई विद्यापीठातील एकूण मंजूर 378 शिक्षकांच्या पदांपैकी 167 पदे कार्यरत असून 211 पदे रिक्त आहेत, तर आता 136 पदांवर भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
विद्यापीठनिहाय भरण्यात येणारी पदे (पंसात रिक्त पदांची संख्या)
मुंबई विद्यापीठ 136 (211), एसएनडीटी 78 (129) कवि कुलगुरू कालिदास 12 (21), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 92 (160), गोंडवाना 11 (20), पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 7 (16), शिवाजी विद्यापीठ 72 (124), पुणे विद्यापीठ 111 (191), मराठवाडा विद्यापीठ 73 (128), उत्तर महाराष्ट्र 6 (28), मराठवाडा, नांदेड 21 (54), संत गाडगेबाबा अमरावती 13 (37), डेक्कन, पुणे 14 (25), गोखले, पुणे 8 (13), टिळक विद्यापीठ 5 (9).
































































