
मागील दहा दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅपम्पसमधील इंटरनेट ठप्प आहे. येथील परीक्षा विभाग, नॅनो सायन्स सेंटर, आंबेडकर भवनातील कारभार इंटरनेटअभावी कोलमडला असून याचा फटका शेकडो विद्यार्थ्यांना बसत आहे. इंटरनेटअभावी पुनर्मूल्यांकन, गुणपत्रिका, व्हेरिफिकेशन, निकाल अशी परीक्षा विभागाची कामे रखडली आहेत. दहा दिवसांपासून विद्यापीठातील वाय-फाय सुविधा का व कशी बंद पडली याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.
केंद्री शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी कालच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या मराठी भाषेतील पुस्तकांच्या वितरण कार्यक्रमासाठी कालिना कॅम्पसमध्ये उपस्थिती लावली होती. त्यांच्यासोबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. त्याच विद्यापीठाच्या कॅम्पसमधील सर्व कामे इंटरनेटशिवाय बंद पडली आहेत. विद्यापीठातील सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने होतात. त्यामुळे तेथील इंटरनेट सुविधा अत्याधुनिक असणे आवश्यक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटअभावी परीक्षा विभागात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागत आहे. इंटरनेट समस्येवर तात्पुरता उपाय म्हणून परीक्षा विभागात ‘डोंगल’चा वापर केला जात आहे. मात्र धीम्या स्पीडमुळे नोकरी, व्यवसायातून वेळ काढून येणाऱ्या विद्यार्थ्यांची कामे खोळंबली आहेत.
परीक्षेला बसावे की निकालाची वाट पहावी…
विद्यापीठातील काही असंतोषी लोकांमुळे इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचा संशय युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी युवासेनेच्या वतीने प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. अभियांत्रिकीच्या आठ हजार विद्यार्थ्यांनी पाचव्या सेमिस्टरचे पेपर पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत, मात्र इंटरनेटअभावी त्यांचे निकाल रखडले आहेत. त्यातच विद्यापीठाने एटीकेटी परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले असून परीक्षेला बसावे की निकालाची वाट पहावी, अशा विवंचनेत विद्यार्थी आहेत.





























































