
मुंबई शहरात देशाच्या कानाकोपऱयातून अनेक लोक शिक्षण, व्यवसाय, नोकरी आणि इतर कारणास्तव वास्तव्यासाठी येत असतात; मात्र मराठी भाषा येत नसल्याने त्यांना या शहरात वावरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा लोकांसाठी मुंबई विद्यापीठात मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवीत आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑफलाइन, ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असून विद्यार्थी 15 जुलैपर्यंत प्रवेश घेऊ शकतात.
मराठी अभाषिकांचा संवाद वाढावा आणि मराठी भाषेशी त्यांचे नाते अधिक घट्ट व्हावे यासाठीच विद्यापीठाच्या मराठी विभागाने अभाषिकांसाठी मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रात मराठी ही व्यवहार भाषा आहे. त्यामुळे या भाषेत संवाद साधणे आवश्यक आहे. मराठी शिकण्याची इच्छा असणाऱयांना या अभ्यासक्रमाचा नक्कीच फायदा होईल. इथल्या मातीशी, इथल्या भाषेशी आणि संस्कृतीशी त्यांचे नाते अधिक घट्ट व्हावे हा या अभ्यासक्रम निर्मितीचा हेतू आहे.
मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्रम
मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी मराठी शिकणाऱया विद्यार्थ्यांना अनेक सुविधा विद्यापीठ देणार असून यामध्ये अभ्यास साहित्य, ग्रंथ, भाषा शिकवणारे तज्ञ प्राध्यापक आणि भाषेविषयक संदर्भ दिले जाणार आहेत. मुख्य केंद्रावरून तसेच अन्य केंद्रांमधून हा अभ्यासक्रम शिकवला जाईल. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाने वेगवेगळय़ा उपक्रमांचे आयोजन केले होते. मुख्यतः अभ्यासक्रमकेंद्री उपक्रम राबवून भाषा आणि साहित्यविषयक जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. अभाषिकांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा त्याचाच एक भाग आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून विभागाने या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. भाषिक कौशल्यांवर भर देऊन अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली आहे, असे मराठी विभागप्रमुख डॉ. वंदना महाजन यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात किंवा अन्य दोन केंद्रावर जाऊन प्रवेश घेऊ शकतात.
ऑनलाईन प्रवेशासाठी Parttimecourses.mu.ac.in या लिंकवर जाता येईल.
संपर्क – प्रवीण मुळम – 8108301602, तुषार मांडवकर 7774947476,
डॉ. लीना प्रभू – 9833497119, अक्षय जमदाडे 8766958875
























































