वाह रे मुंबई विद्यापीठ! राजकीय नेत्याचा नापास झालेला पीए दोन दिवसांत पास

सामना प्रतिनिधी, मुंबई

पास होणार असा आत्मविश्वास असूनही परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करतात. त्याचा निकाल लागायला एक-दीड महिना लागतो. पण एलएलएम परीक्षेत नापास झालेला एका राजकीय नेत्याचा पीए मुंबई विद्यापीठाच्या आशीर्वादाने पुनर्मूल्यांकनात अवघ्या दोन दिवसांत पास झाला. त्यासाठी या नेत्याने काही दबाव आणला की विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना काही आमिष दाखवले, अशी चर्चा सुरू आहे.

एका राजकीय नेत्याचा पीए असलेल्या अमोल सुखदेव गवळी या विद्यार्थ्याने मुंबई विद्यापीठातून एलएलएम विषयाची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा निकाल गेल्या 26 मार्च रोजी जाहीर झाला. त्यात एका विषयात गवळी हा नापास झाला होता. त्यामुळे पुनर्मूल्यांकनासाठी त्याने विद्यापीठाकडे अर्ज केला होता. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर निकाल जाहीर करायला किमान एक महिना तरी लागतो. अनेक विद्यार्थी निकालासाठी विद्यापीठाचे हेलपाटे घालत असतात, मात्र गवळी याचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल 1 एप्रिल रोजीच विद्यापीठाने जाहीर केला. त्यात तो पास झाला होता.

यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्यापीठाचे उप कुलसचिव विनोद माळाळे यांच्याशी बोला, असे उत्तर दिले. माळाळे यांना संपर्क साधला असता समोरून प्रतिसाद मिळाला नाही.

दोन दिवसांत पुनर्मूल्यांकनाचा निकाल लागणे ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. विद्यापीठाचा परीक्षा विभाग इतक्या वेगाने काम करत असेल तर हजारो विद्यार्थ्यांना महिना-दीड महिना निकालासाठी ताटकळत राहावे लागणार नाही. त्यांनाही त्यांचा निकाल हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या दिवसांत मिळू शकेल.
– अॅड. वैभव थोरात, युवासेना सिनेट सदस्य