
यंदा मान्सून दोन आठवडे आधीच म्हणजे मे महिन्यात पूर्ण ताकदीने दाखल झाला. या वर्षीच्या मान्सूनच्या आगमनाने सर्वकालीन विक्रम मोडले आहेत. यामागे वातावरणातील मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) हा एक महत्त्वाचा घटक असल्याचे दिसून आलेय.
साधारणपणे केरळमध्ये पाऊस पडल्यानंतर सुमारे 10 दिवसांनी मुंबईत मान्सूनची सुरुवात होते. केरळमध्ये सुरुवात होण्याची सामान्य तारीख 1 जून असते, त्यानंतर नैऋत्य मान्सून साधारणपणे 6 जूनपर्यंत महाराष्ट्रात आणि नंतर 11 जूनपर्यंत मुंबई किनाऱयावर पोहोचतो. हवामान खात्याने 24 मे रोजी केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली, जो 2009 नंतरचा सर्वात लवकर पाऊस आहे. तसेच नैऋत्य मान्सून 24 तासांच्या आत केरळहून महाराष्ट्रात पोहोचला.
आयएमडी मुंबईच्या संचालक शुभांगी भुते यांच्या मते, ‘अत्यंत अनुकूल’ परिस्थितीमुळे यंदा मान्सूनला लवकर सुरुवात आणि जलद प्रगती झाली. यामागे मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) हा एक महत्त्वाचा घटक आहे. एमजेओ घटक हिंद महासागरात उगम पावतो आणि हिंदुस्थानच्या मान्सूनवर परिणाम करणाऱया सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळसदृश स्थिती तसेच नैऋत्य मान्सूनच्या जलद हालचालींना मदत झाली.
एमजेओ म्हणजे काय?
एमजेओ ही मुळात वारे, ढग आणि दाब यांची एक जटिल, गतिमान प्रणाली आहे. ती पूर्वेकडे 4-8 मीटर प्रति सेकंद वेगाने प्रवास करते. 30 ते 60 दिवसांत एमजेओ वाऱयाचे पट्टे जगभर प्रवास करू शकतात आणि हवामानात लक्षणीय बदल घडवून आणू शकतात. अनुकूल टप्प्यात ते हिंदुस्थानातील मान्सूनचा पाऊस वाढवू शकतात. आयएमडीने 22 मे रोजी जारी केलेल्या अंदाजाच्या वेळी एमजेओ फेज 4 मध्ये होता. हा टप्पा जोरदार पाऊस आणि वादळाचे सूचक आहे.