
सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर तसेच रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे रत्यावर वाहतूककोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
आयएमडीने रविवारीही ऑरेंज अलर्ट जारी केला होता. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (१८ ऑगस्ट) पुन्हा एकदा मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या मते, शहरातील बोरिवली, ठाणे, कल्याण, मुलुंड, पवई, सांताक्रूझ, चेंबूर, वरळी, नवी मुंबई आणि कुलाबा येथे विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पाणी साठण्यास सुरुवात झालेली आहे. यामुळे लोकल ट्रेन सेवांवरही परिणाम झाला आहे.
महाराष्ट्राच्या इतर भागात पिवळा आणि नारंगी अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, अमरावती, वर्धा आणि नागपूरमध्ये पिवळा अलर्ट लागू आहे. त्याच वेळी, नाशिक, खंडाळा, भीमाशंकर, पुणे, महाबळेश्वर, सातारा, जळगाव, धुळे, नंदुरबार, सांगली, शिर्डी, पंढरपूर, उस्मानाबाद, परभणी आणि चंद्रपूर यासह अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट लागू आहे.
डहाणू, अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी यासारख्या कोकण भागातही सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांसाठी हवामान अंदाजानुसार आयएमडीने असा इशारा दिला आहे की २० ऑगस्टपर्यंत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. २३ ऑगस्टपर्यंत हलका पाऊस सुरू राहील.
मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात अहमदनगर, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये १९ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस, वादळ आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. १८ ऑगस्ट रोजी मराठवाडा प्रदेशात (बीड, संभाजीनगर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि जालना) ऑरेंज अलर्ट आणि १९ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट लागू असेल. प्रशासनाने नागरीकांना गरजेशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.