
सामना प्रतिनिधी। मुंबई
चंद्रपूरमधील राजुरा येथे आदिवासी आश्रमशाळेत झालेल्या अत्याचार प्रकरणी संबंधित संस्थाचालकालाही सहआरोपी करावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत शिवसेना उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी 2003-04 महाराष्ट्र विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला तदर्थ समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
राजुरा येथील केंद्र सरकार अनुदानप्राप्त आदिवासी वसतिगृहातील दोन अल्पवयीन मुलींना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याची तक्रार 14 एप्रिल रोजी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी वसतिगृह उपअधीक्षक नरेंद्र किरूटकर यांच्यासह नीता ठाकरे क कन्नाके या महिला कर्मचाऱयांना अटक केली आहे. मात्र या घटनेतील आणखी आरोपी बाहेर असून एकूण 18 मुलींवर अत्याचार झाला आहे. राजुऱयातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या संस्थेद्वारे ही शाळा व वसतिगृह चालवले जात आहे. त्यामुळे सुभाष धोटे यांना सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शिवाय अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
अशा केल्या मागण्या
- आश्रमशाळेतील गैरप्रकार रोखण्यासाठी महिला दक्षता समित्यांची नेमणूक करून स्थानिक पोलीस स्टेशनला जोडाव्यात.
- गृह, आदिवासी, समाजकल्याण, शिक्षण व महिला व बालविकास या पाच विभागांची टास्क फोर्स तयार करून राज्यातील आश्रमशाळांची तपासणी करावी
- आश्रमशाळेत तक्रारपेटय़ा लावण्यात याव्यात.
- या आश्रमशाळेचा सत्यशोधन अहवाल त्वरित शासनाने मागवावा.


























































