भूमाफिया बिल्डर पळाले; सर्वसामान्यांचे संसार रस्त्यावर, मुंब्र्याच्या खान कंपाऊंडमध्ये आक्रोश

शहरात स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मोलमजुरी, कष्ट करीत पै पै जमा करून अनेकांनी मुंब्र्याच्या खान कंपाऊंडमध्ये घरे विकत घेतली. काही आठवड्यापूर्वी अनेकांचा नवीन घरात गृहप्रवेश झाला. संसाराची घडी बसणार इतक्यात न्यायालयाचा आदेश आला आणि होत्याचे नव्हते झाले. तब्बल 17 इमारती महापालिकेने जमीनदोस्त केल्या. काही तासातच घर दिसेनासे झाले. सर्वसामान्यांचे संसार रस्त्यावर आल्याचे भयाण वास्तव दिसून येत आहे. असंख्य कुटुंबांना बेघर करून बेकायदा इमारतींचे इमले उभारले. बिल्डर मात्र पळून गेले आहेत.

खान कंपाऊंडमध्ये सध्या संताप, आक्रोश आणि डोळ्यात अश्रू दिसत आहेत. ऐन पावसाळ्यात आम्ही जायचे कुठे, असा सवाल रस्त्यावर आलेल्या रहिवाशांनी केला आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्याची जमापुंजी खर्च करून या बेकायदा इमारतीमध्ये घरे घेतली. मात्र आता या इमारतीमध्ये राहत असलेल्या रहिवाशांचे अश्रू काही थांबत नाहीत.