
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना संधी दिल्यामुळे राज्यातील मुंडे समर्थकांमध्ये असंतोष खदखदत असताना व त्यावरून काही पदाधिकाऱयांनी राजीनामे दिलेले असताना मुंडे भगिनींच्या नाराजीकडे पक्षनेतृत्वाने साफ दुर्लक्ष केले आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज झालेल्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत यावर अवाक्षरही कोणी काढले नाही.
उत्तर प्रदेशसह काही महत्त्वाच्या राज्यांत पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची डिनर मीटिंग बोलावली होती. या बैठकीला पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह भाजपचे सगळे राष्ट्रीय सचिव, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष हे उपस्थित होते. या बैठकीत फक्त आणि फक्त पक्ष संघटन बळकट करणे, केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविणे या मुद्दय़ांवर चर्चा झाली.
नाराजीकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण
केंद्रीय मंत्रिमंडळात वंजारी समाजाला प्रतिनिधित्व देताना मुंडे भगिनींना जाणीवपूर्वक डावलले गेले आहे. घराणेशाही नको, असे कारण दिले जात असले तरी दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारख्या काँग्रेस व घराणेशाहीमधून पुढे आलेल्या नेत्याला भाजपने संधी दिली आहे. मुंडेंवरील कथित अन्यायाविरोधात काही पदाधिकाऱयांनी राजीनामे दिले असले तरी त्याकडे पक्षाने दुर्लक्ष करण्याची रणनीती अवलंबली आहे.



























































