प्लॅस्टिक बंदी : नगरमध्ये बोल्हेगाव, सावेडीतही मनपाची कारवाई!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत बुधवारीही  मोठ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. नवीपेठ, सावेडी भागासह बोल्हेगाव परिसरातही मनपाच्या पथकांनी दुकानांमध्ये छापे मारुन 80 किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे. या कारवाईत 39 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मागील आठवड्यापासून मनपाने प्लॅस्टिक पिशव्या वापरणार्‍यांवर कारवाईला सुरूवात केली आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दोन दिवसांपासून मनपाने मोहिमेला वेग दिला असून, मध्य शहरासह आता सावेडी, नागापूर व बोल्हेगावातही कारवाईला सुरूवात केली आहे.

माळीवाडा कार्यालयाचे स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख यांच्या पथकाने दिनेश सारीज्, क्रेझी कलेक्शन, साईनाथ बॅग हाऊस, महाराणी साडी, सोनू बॅग हाऊस, न्यू फातमा ड्रेसेस आदी दुकानांमध्ये छापे टाकून 50 किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या. या दुकानदारांना 30 हजार 200 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

मनपात आवारात थुंकणार्‍या तिघांना दंड!

महापालिकेच्या आवारात थुंकणार्‍यांवर 200 रुपये दंड आकारण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून, घनकचरा विभागाने बुधवारी तीन नागरिकांवर प्रत्येकी 200 रुपये दंडाची कारवाई केली असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कारवाई सुरू होताच काहींनी मनपा आवारातून बाहेर पळ काढला.