
मुंबई, पुण्यासह राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करायला सुरुवात केली आहे. यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही मोठय़ा प्रमाणात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. उमेदवारांसोबत प्रचार रॅली काढण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज भासत असून कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. बेरोजगार तरुणांनाही हाताला काम मिळाल्याचे चित्र निवडणुकीत दिसत आहे.
निवडणुकीच्या या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार रॅली, तसेच प्रचार सभा, कॉर्नर बैठका, चहा पे चर्चा आणि मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे. यासाठी आपल्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. अपत्र्जनाधार नसलेले उमेदवार महिला आणि तरुणांना 500 रुपये ते 800 रुपये मानधन देत आहे. महापालिकेच्या या निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. निवडणूक प्रचारात डिजिटलचाही वापर मोठय़ा प्रमाणात केला जात आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे पक्षाचे झेंडे, शाल, टोपी, बॅच, बिल्ले, उपरणे, टोप्या, बॅचेस आणि विविध पक्षांचे चिन्हांची उमेदवारांकडून खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत शाही उपरणे आणि शाही पगडीलाही कार्यकर्त्यांची विशेष मागणी आहे.
500 ते 800 रुपयांपर्यंत रोजंदारी
जनाधार नसलेल्या उमेदवारांनी भाडोत्री कार्यकर्ते जमा करायला सुरुवात केली आहे. तरुणांना प्रचार करण्यासाठी 500 ते 800 रुपये दिले जात आहेत. या उमेदवारांनी वेगवेगळ्या भागांत कार्यालये थाटली असून या कार्यालयात बसून कागदपत्रे जमा करणे, प्रचारासाठी परवानगी घेणे, प्रचाराचा हिशोब ठेवणे व अन्य कामे करणाऱ्यांना 1 हजार ते 1200 रुपये दिले जात आहेत.
भाडोत्री कार्यकर्त्यांना दोन वेळचे जेवण, नाश्ता
उमेदवारांचा दिवसभर प्रचार करण्यासाठी भाडोत्री कार्यकर्त्यांना दोन वेळचे जेवण, सकाळचा नाश्ता, दोन ते तीन वेळा चहा, बिस्किटे आणि पाण्याची बॉटल पुरवली जात आहे. भाडोत्री कार्यकर्त्यांवर रोजचा खर्च सरासरी दोन ते तीन हजारांच्या घरात जात असल्याचे दिसत आहे. गलोगल्ली फिरणाऱ्या महिला आणि तरुणांना प्रचार करण्यासाठी 500 रुपये दिले जात आहेत.


























































