
ठाणे पालिकेने जाहीर केलेल्या मतदार यादीवर हरकती आणि सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. या प्रारूप मतदार यादीवर तब्बल अडीच हजार ठाणेकरांच्या हरकती, सूचना आल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक आक्षेप दिव्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान, ही दुबार नावे शोधण्यासाठी पालिकेचे कर्मचारी स्पॉटवर जाणार आहेत.
आगामी महापालिकांच्या निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेच्या वतीने प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. या याद्या सदोष असल्याचे सांगत महाविकास आघाडीने अनेक आंदोलने केली. निवेदने देण्यात आली. तसेच मतदार यादीवर आक्षेप घेत पालिका प्रशासनावर चौफेर टीका विविध पक्षांनी केली. राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील घोळ निस्तरा अशी सूचना गुरुवारी ठाणे महापालिकेला केली. त्यामुळे आता ठाणे महापालिकेनेदेखील निवडणूक आयोगाच्या सूचना गांभीर्याने घेत सदोष मतदार याद्या सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक
निवडणूक आयोगाची बैठक संपल्यानंतर तातडीने ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीला निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन दुबार मतदार आणि मतदार यादीमधील घोळ निस्तारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
10 डिसेंबरपूर्वी निपटारा करावा
प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 3 डिसेंबर अंतिम मुदत होती. त्यानुसार दाखल हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन 10 डिसेंबरपूर्वी सर्व घोळांचा निपटारा करावा. त्यानंतर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होतील असे ठाणे महापालिकेने म्हटले आहे.



























































