
सामना ऑनलाईन । मुंबई
चेंबूर येथे मालमत्तेच्या कारणातून पहिल्या पत्नीच्या मुलाने वडिलांची गळा दाबून तर माहीमच्या शाहूनगरमध्ये चोराने एका वृद्धेची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली.
वाशीनाका येथील पुष्पांजली टॉवरमध्ये राहणाऱ्या रेहमतुल्ला सय्यद (60) यांची त्यांच्याच मुलाने टाटा टॉवरजवळील मच्छी मार्केट परिसरात मारहाण केल्यानंतर गळा आवळून हत्या केली. रेहमतुल्ला यांची हत्या त्यांच्याच पहिल्या पत्नीच्या 35 वर्षीय मुलाने केली. याप्रकरणी रेहमतुल्ला यांच्या तिसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आरसीएफ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहमतुल्ला आणि त्यांची पहिली पत्नी यांच्यात मालमत्ता आणि पैशांवरून वाद सुरू होता. त्यातूनच हा हत्येचा गुन्हा घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शाहूनगर येथील मिलिंदनगरात महापालिकेच्या इमारतीमधील एक विंगमध्ये राहणाऱ्या वसंत लक्ष्मीनारायण (79) यांची अज्ञात चोरट्याने त्या घरी असताना ओढणीने गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर चोराने वसंत यांच्या अंगावरील व घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी शाहूनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































