धावत्या ट्रकमध्ये चालकाची हत्या, गाडी चालविण्यावरून दोन सहकारी चालकांमध्ये खुनी वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाडी चालविण्यावरून दोन सहकारी चालकांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या खुनात झाल्याची घटना नगर-मनमाड महामार्गावरील सावळीविहीर फाटय़ाजवळ घडली आहे. चालत्या ट्रकमध्ये खून केल्यानंतर मृतदेह रस्त्यावर फेकून देत आरोपी ट्रकसह कोपरगाव पोलिसांत दाखल झाला आहे.

सतराम सिंग असे मृताचे नाव असून, रमेश मदन राऊत (रा. इंदूर, मध्य प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.

नगर-मनमाड महामार्गावरील आज शुक्रवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळच्या वेळी सतराम सिंग आणि रमेश राऊत हे दोघे सहकारी ट्रकचालक असून, अकलूज येथून पशुखाद्याची पावडर घेऊन इंदूरकडे निघाले होते. सावळीविहीर फाटा शिवारात ट्रक चालविण्यावरून त्यांच्यात वाद झाले. या वादातून रमेशने गाडीतील रॉड आणि व्हीलपान्हा डोक्यात घालून सतरामचा खून केला. त्यानंतर चालत्या ट्रकमधून मृतदेह रस्त्यावर फेकून देत तो कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला.

दरम्यान, मृतदेह सावळीविहीर फाटा येथे सापडल्याने व शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने कोपरगाव पोलिसांनी खून करणारा आरोपी रमेश राऊत याला शिर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. त्यानुसार शिर्डी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील तपास करीत आहेत. आरोपी राऊत याला ताब्यात घेतल्यानंतर शिर्डी पोलिसांनी चौकशी केली. गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकानेही त्याची चौकशी केली. शिर्डी पोलिसांनी संबंधित ट्रक ताब्यात घेतला असून, ट्रकमधील लोखंडी रॉड आणि व्हीलपान्हा, आरोपीकडील दारूची बाटली, पैशांचे पाकीट पोलिसांनी जप्त केले आहे.