
सामना प्रतिनिधी । नांदेड
जिल्हाधिकारी कार्यालय, गुरुव्दारा बोर्ड, नांदेड महापालिका व सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ नोव्हेंबर रोजी संगीतकार राम कदम यांनी संगीतबध्द केलेल्या निवडक गितांचा बहारदार मराठमोळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन अॅड.गजानन पिंपरखेडे यांची असून या कार्यक्रमाची निर्मिती पत्रकार विजय जोशी यांची आहे.
संगीतकार राम कदम हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ संगीतकार होते. त्यांनी संगीतबध्द केलेले एक गाव बारा भानगडी, पिंजरा, एकटा जीव सदाशिव, गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, कलावंतीण आदी चित्रपट चांगलेच गाजले. वेगवेगळ्या लोकगीत, लावणी, भक्तीगीत, भावगीत यामुळे त्यांच्या संगीतबध्द केलेल्या गाण्यांना महाराष्ट्रातील रसिकांनी उचलून धरले. संगीतकार राम कदम यांनी संगीतबध्द केलेल्या निवडक गीतांचा कार्यक्रम दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.४५ वाजता बंदाघाटच्या नयनरम्य परिसरात आयोजित करण्यात आला आहे. यात विशेष सहकार्य डॉ.प्रमोद देशपांडे यांचे असून संगीत संयोजन सिध्दोधन कदम यांचे आहे. त्यांच्यासमवेत शेख नईम, राजू जगदने, सिध्दोधन कदम, रतन चिते, रवी भद्रे हे संगीत साथ करणार आहेत. झीटीव्हीचा गाजलेला गायक योगेश रणमले, विलास गारोळे, धनश्री सरदेशपांडे, सौ. वर्धिनी जोशी- हयातनगरकर, माधुरी पाटील – वाकोडकर, माधवी पाठक हे दिग्गज कलावंत यात आपली गिते सादर करणार आहेत. अत्यंत परिश्रमपूर्वक मेहनत घेवून अॅड. गजानन पिंपरखेडे यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. नांदेडच्या रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिवाळी पहाट संयोजन समितीने केले आहे.




























































