बाबरीचा ढिगारा आम्हाला द्या! मुस्लिम समाजाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाबरी मशिदीचा ढिगारा आणि कुराणाची आयते लिहिलेल्या दगडांसह अनेक सामान आम्हाला परत द्या अशी मागणी बाबरी मशीद कृती समितीने केली आहे. त्यासाठी समिती सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

बाबरी मशीद कृती समितीची नुकतीच लखनौमध्ये बैठक झाली. यावेळी समितीचे सहाय्यक सचिव आणि पक्षकार हाजी महबूब यांनी ही माहिती दिली. ‘बाबरी मशिदीचा ढिगारा रामजन्म गर्भगृहात ठेवण्यात आला आहे. मशिदीचा ढिगारा पवित्र मानला जातो. हा ढिगारा परत घेऊन मुस्लिम समाज आपल्या पद्धतीने तो वापरेल. मात्र, एका मशिदीचे सामान दुसर्‍या मशिदीसाठी किंवा घरासाठी वापरता येत नाही. तरीही हा ढिगारा आम्हाला मिळावा, तो आम्ही आमच्या पद्धतीने वापरू’ असे महबूब यांनी सांगितले. त्याचबरोबर समितीने राममंदिराच्या निर्णयाविरोधातही याचिका दाखल करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे प्रमाणपत्र आवश्यक

बाबरीच्या ढिगार्‍याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश न्यायालयाने दिलेले नाहीत.  त्यामुळे ढिगारा नेताना त्याचा अनादर होऊ शकतो. ढिगार्‍यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. दरम्यान, बाबरीचा ढिगारा मुस्लिम समाज घेऊन जाऊ शकतात. त्याला आमची कोणतीही हरकत नाही असे  रामलल्ला विराजमानचे पक्षकार त्रिलोकी नाथ पांडे यांनी म्हटले आहे.