मुठा कालव्याचे अर्धे भगदाड बुजविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

खडकवासला धरणाच्या उजव्या मुठा कालव्याचे भगदाड बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सिमेंट काँक्रीटची अर्धी भिंत बांधून झाली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत संपूर्ण भिंतीचे काम पूर्ण होईल, असे खडकवासला पाठबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

गुरुवारी कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेनंतर पाठबंधारे विभागाने तातडीने कालवादुरुस्तीचे काम सुरू केले. भगदाड पडलेल्या जागेवर सिमेंट काँक्रीटची भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. कालवा पूर्णपणे बंद असल्याने लष्कर जलकेंद्राला कालव्यातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता. परिणामी, शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच काही भागांत पाणीपुरवठा झालेला नाही.

कालव्यातून काल पाणी सोडण्यात आले; परंतु भगदाड पडलेल्या ठिकाणातून पाणी वाया गेले. तसेच दांडेकर पूल झोपडपट्टीत पुन्हा पाणी आल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. भिंत बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यासाठी सिमेंट काँक्रीटचे अद्ययावत तंत्र वापरले जात आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत भिंतीचे काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

‘लष्कर’साठी पंपिंगद्वारे कालव्यातून पाणी
कालवा बंद असल्याने लष्कर जलकेंद्राला कालव्यातून आवश्यक असणारा १५० एमएलडी पाणीपुरवठा होऊ शकत नाही. त्यावर पर्याय म्हणून बंद नळ योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या २५० एमएलडी पाण्याबरोबरच कालव्यातून आवश्यक असणारा १५० एमएलडी पाणीपुरवठा पर्वती जलकेंद्रातून पंपिंग करून कालव्यात सोडण्यात आला आहे. प्रवाहाने तो लष्कर जलकेंद्राला दिला जात आहे.

खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास अवधी लागणार असल्याने महापालिकेतील पर्वती जलकेंद्रातून पंपिंगद्वारे १५० एमएलडी म्हणजेच ६० क्युसेक्स वेगाने पाणी पंपिंग करून कालव्याच्या पुढच्या भागात सोमवारी सोडले. त्यामुळे लष्कर जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.