देशासह राज्याचा विकास हेच ध्येय; नितीन गडकरी यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

मागील पाच वर्षांपासून देशाचा झपाट्याने विकास होत आहे. आता देशासह राज्य आणि विदर्भाचा विकास करणे हेच ध्येय ठेऊन कार्य करीत असून पुढेही असेच कार्य करण्याचा निर्धार केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. सती सामकी माता बंजारा समाज महिला ब़हूउद्देशीय संस्था आणि समस्त बंजारा समाजाने आयोजित केलेल्या बंजारा समाज मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार सुधाकर देशमुख, जितेंद्र महाराज, प्रगती पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यात मंत्री असताना अनेक विकास प्रकल्प राबविले होते. त्याच अनुभवाचा फायदा केंद्रात काम करताना होत आहे. जनतेने दिलेले आशीर्वाद आणि मतांमुळे शक्य झाले आहे, असे गडकरी म्हणाले. नवनवीन संकल्पना देशभरात राबविण्याचा माझा निर्धार आहे. पाच वर्षांपूर्वी राज्यातून 5200 किमीचे महामार्ग जात होते, ते आता 22400 किमीचे करण्यात आले आहेत. 17 लाख कोटींची विकास कामे गेल्या पाच वर्षांमध्ये केली आहेत. 100 वर्ष रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत असे रस्ते देशभरात बांधण्यात येत आहेत. युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. देशात नावीन्यपूर्ण व अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. तसेच शहरातील अंबाझरी येथील जागेवर स्व. वसंतराव नाईक यांच्या नावावर 30 हजार क्षमतेचे ‘ओपन एअर थिएटर’ उभारण्याची मानस आहे. समाजाला नवीन दिशा देण्याची गरज असल्यामुळे माझा आणि माझ्या पक्षाचा युवकांच्या विकासावर भर आहे. गेल्या निवडणुकीत मी तीन लाख मतांनी विजयी झालो होतो. यंदा हा आकडा पाच लाखांच्यावर जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.