विद्या बालन म्हणते, माझे वाढलेले वजन राष्ट्रीय विषय ठरला होता!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अभिनेत्री विद्या बालन हिने देखील बॉलिवूडमध्ये कुणीही गॉडफादर नसताना आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.

विद्या बालन तिच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे, पण तिच्या वाढत्या वजनामुळे तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागला आहे. त्याबाबत तिने नुकतेच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बॉडी शेमिंगबाबत सडेतोड उत्तर देत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने तिचा अनुभव शेअर करताना सांगते की, मी जे काही आज आहे त्या परिस्थितीतून जाणे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. त्यावेळी बॉडी शोमिंगबाबत होणारी टीका सार्वजनिक आणि तितकीच अपमानास्पद होती. माझ्यासाठी हे क्षेत्र नवीन होते. या क्षेत्रात चित्रपटाची कसलीच पार्श्वभूमी नव्हती. तिथे मला कोणी चूक-बरोबर सांगणारे नव्हते. त्यामुळे माझं वाढलेलं वजन राष्ट्रीय पातळीवरचा विषय ठरला होता.

पुढे ती सांगते की, मी कायम लठ्ठच होते. त्यामुळे माझ्या अस्थिर वजनाचा कधी माझ्यावर परिणाम झाला नाही. उलट मी यासगळ्यातून खूप पुढे आलेय आता. इथपर्यंतचा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता. यात अनेक चढ उतार आले. आयुष्यभर हार्मोनल समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे एका टप्प्यावर मी शरीराचा द्वेष करु लागले होते. असे वाटायचे शरीरच माझा अडथळा ठरतय. ज्यावेळी मला सुंदर दिसण्यासाठी दबाव असायचा. अशावेळी मला आणखी राग यायचा आणि मी निराश व्हायचे.

स्वतःच्या शरीराविषयीचा द्वेष ते प्रेम या प्रवासाबद्दल सांगताना विद्या म्हणाली की, आधी मी माझ्या शरीराचा द्वेष करायचे. पण काही काळाने माझा स्वत:कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि स्वत:वर प्रेम करायला सुरुवात केली. ज्यादिवशी स्वत:वर प्रेम करायला सुरुवात केली त्या दिवसापासून लोकं मला स्वीकारायला लागली. त्यावेळी लोकांचा माझ्यावर प्रेम, स्तुती, कौतुकांचा वर्षाव होऊ लागला. नंतर मला जाणीव झाली की माझे शरीर एकमात्र आहे, ज्याने मला जिवंत ठेवले आहे. पण ज्यादिवशी हे शरीर काम करणं बंद करेल तेव्हा कुठेच जाऊ शकत नाही. त्यामुळे मी माझ्या शरीराची आभारी आहे. माझ्यासाठी ते महत्वाचे नाही की मी कोणत्या परिस्थितीतून गेलीय, पण जिवंत त्याच शरीरामुळे आहे हे महत्वाचे असल्याचे विद्या सांगते.

परिणीता या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या विद्या बालन द डर्टी पिक्चर, कहानी, भूल भुलैया, मिशन मंगल आणि लगे रहो मुन्ना भाई यासारख्या सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. शकुंतला देवी बायोपिकमध्ये ती शेवटची दिसली होती.